UPI च्या नव्या नियमांबाबत मोठे स्पष्टीकरण! ₹2,000 पेक्षा जास्त व्यवहारांवर 0.4% MDR, पण ग्राहकांकडून शुल्क नाही

1 ऑक्टोबरपासून UPI पेमेंटवर ₹2,000 पेक्षा जास्त व्यवहारांसाठी 0.4% MDR लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या नियमाबाबत सोशल मीडियावर ग्राहकांकडून अतिरिक्त कर किंवा शुल्क आकारले जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या पात्र P2M म्हणजेच ग्राहकाकडून व्यापाऱ्याला होणाऱ्या व्यवहारांवर 0.4% MDR लागू होईल. मात्र हा MDR ग्राहकावर लावलेला कर नाही. ग्राहकांना UPI पेमेंट करताना हा खर्च स्वतंत्रपणे भरावा लागणार नाही.

उदाहरणार्थ, ₹5,000 च्या पात्र व्यापारी UPI व्यवहारावर 0.4% MDR म्हणजे ₹20 इतका MDR होतो. मात्र ₹20 MDR आणि त्यावर ₹3.60 GST मिळून ग्राहकाने ₹23.60 अतिरिक्त द्यायचे, असा अर्थ अधिकृत नियमांचा नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की MDR हा व्यापारी पेमेंट इकोसिस्टममधील शुल्क आहे आणि तो ग्राहकाकडून वसूल करू नये.
याशिवाय, P2P म्हणजे व्यक्तीकडून व्यक्तीला होणारे UPI व्यवहार कोणत्याही रकमेचे असले तरी विनाशुल्क राहतील. ₹2,000 पर्यंतचे व्यापारी UPI व्यवहारही MDRमुक्त राहतील. सरकारच्या माहितीनुसार सुमारे 96 टक्के P2M व्यवहार या नव्या MDR मुळे प्रभावित होणार नाहीत.

महेश ट्रेडिंग कंपनीचे संचालक गौरीशंकर हेडा यांनी या बदलाबाबत व्यापारी वर्गाची भूमिका आणि निर्माण झालेल्या संभ्रमावर प्रतिक्रिया दिली आहे.



