सेवाग्रामच्या बापू कुटीत अभिजीत दीपके तल्लीन! प्रार्थनेने वर्धा दौऱ्याची सुरुवात

ऐतिहासिक बापू कुटीची पाहणी; आश्रमाचा इतिहास आणि साहित्याची घेतली माहिती, आज विद्यार्थ्यांशी संवाद
वर्धा : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके सध्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या दौऱ्याची सुरुवात ऐतिहासिक सेवाग्राम येथील बापू कुटीला भेट देऊन झाली. बापू कुटीची पाहणी करताना त्यांनी आश्रमाचा इतिहास, तेथील विविध साहित्य आणि परिसराची माहिती जाणून घेतली.
सेवाग्राम येथे पोहोचल्यानंतर दीपके यांनी बापू कुटीची पाहणी केली. यावेळी आश्रमाशी संबंधित ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासोबतच तेथील विविध साहित्याचीही माहिती त्यांनी घेतली. काही वेळ बापू कुटीमध्ये प्रार्थना करत ते तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी अभिजीत दीपके यांच्यासोबत कराळे मास्तर आणि कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सेवाग्रामच्या ऐतिहासिक वातावरणात काही वेळ घालवल्यानंतर दीपके यांनी आपल्या वर्धा जिल्हा दौऱ्याला पुढे सुरुवात केली.
दरम्यान, अभिजीत दीपके यांच्याकडून अलीकडच्या काळात विद्यार्थी आणि शिक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर विविध उपक्रम राबवले जात आहेत. ऑगस्टमध्ये त्यांच्या संघटनेने ग्रामीण शाळांमधील मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणारे स्कूल ठीक करो अभियान सुरू केले होते.
वर्धा दौऱ्यातही दीपके विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या, शिक्षण आणि त्यांच्या प्रश्नांवर या संवादात काय चर्चा होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
सेवाग्रामच्या बापू कुटीपासून सुरू झालेला अभिजीत दीपके यांचा वर्धा दौरा पुढे कोणत्या मुद्द्यांवर केंद्रित राहतो आणि विद्यार्थ्यांशी संवादातून कोणते प्रश्न समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



