AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीच्या दाभ्यात बंद घरात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह!

घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर प्रकार उघडकीस; घातपात की नैसर्गिक मृत्यू, बडनेरा पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : अमरावतीच्या बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा येथे बंद घरात ४५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वैशाली सुनील मेहरे असे मृत महिलेचे नाव आहे. घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी दाभा परिसरातील एका बंद घरातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. संशय आल्याने नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच बडनेरा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनमंत ऊरलागोंडावार, पोलीस निरीक्षक निलेश करे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळावरील आवश्यक नमुने आणि पुरावे संकलित करण्याची प्रक्रिया करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार, महिलेचा मृतदेह चार ते पाच दिवसांपासून घरात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यू नेमका कधी आणि कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, परिसरात काही कौटुंबिक वादाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी या चर्चेला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे सध्या पोलिसांकडून प्रत्येक शक्यता तपासली जात आहे.

वैशाली मेहरे यांचा मृत्यू घातपातामुळे झाला की नैसर्गिक कारणाने, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल तसेच फॉरेन्सिक तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, बडनेरा पोलिसांकडून घटनास्थळाचा तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील चौकशी सुरू असून, या मृत्यूमागील नेमके गूढ काय आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button