परतवाड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई!

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ९ गोवंशांची सुटका; मालवाहू बोलेरोसह ३ आरोपी अटकेत
परतवाडा | प्रतिनिधी
कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात परतवाडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका मालवाहू बोलेरो वाहनातून ९ गोवंशीय जनावरांची सुटका करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत वाहनासह एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, धारणी रोडवरून एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनातून गोवंशीय जनावरांची चोरी करून त्यांना कत्तलीच्या उद्देशाने परतवाडा मार्गे करजगावकडे नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने धारणी रोडवरील बुरडघाट बस स्टॉपजवळ सापळा रचला. दरम्यान, संशयित बोलेरो वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे आढळून आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, जनावरांना वाहनात दाटीवाटीने बांधून वाहतूक केली जात होती. वाहनचालक आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तींकडे जनावरांच्या वाहतुकीसंदर्भात आवश्यक कागदपत्रांची विचारणा केली असता समाधानकारक कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या कारवाईत सोहेल अहमद शकील अहमद, वय २२ वर्षे; समीर खान अजीम खान, वय २२ वर्षे आणि रिजवान अहमद शेख निसार, वय १९ वर्षे, रा. करजगाव, ता. चांदूरबाजार यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी ९ गोवंशीय जनावरे, अंदाजे किंमत ८० हजार रुपये, तसेच एमएच १८ बीएच ०४७५ क्रमांकाची चारचाकी मालवाहू बोलेरो, किंमत २ लाख रुपये, असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त करण्यात आलेल्या गोवंशीय जनावरांना श्री सैतुताई हनुमान गोसेवा समिती, अचलपूर येथे सुरक्षिततेसाठी दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परतवाडा पोलिसांचे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणाचा पुढील तपास परतवाडा पोलीस करत असून, गोवंश वाहतुकीमागील संपूर्ण साखळी आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.



