कारंजा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात

सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद पिके करपण्याच्या मार्गावर; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
कारंजा | प्रतिनिधी
कारंजा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट ओढावले आहे. पावसाअभावी सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या पिकांची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून अनेक भागांत पिके करपण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कारंजा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. मात्र त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पिकांना आवश्यक वेळी पाऊस न मिळाल्याने शेतजमिनीतील ओलावा कमी होत असून पिके सुकण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कर्ज काढून केलेला खर्च वाया जाण्याची भीती
बियाणे, खते, औषध फवारणी आणि मजुरीसाठी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामाची तयारी केली. मात्र आता पिके हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने हा संपूर्ण खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. पावसाने आणखी दडी मारल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर ७ सप्टेंबर रोजी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश पाटील मुंदे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी कारंजा तहसीलदारांची भेट घेत निवेदन साद केले. यावेळी तालुक्यातील सद्यस्थितीची पाहणी करून शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
प्रत्यक्ष पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी
महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यासोबतच पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळवून द्यावी, पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देऊन कर्जमाफी जाहीर करावी तसेच विविध सरकारी योजनांचा लाभ संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मिळवून द्यावा, अशा मागण्याही करण्यात आल्या.
शेकडो शेतकऱ्यांचा दुष्काळाच्या मागणीला पाठिंबा
कारंजा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीला शेकडो शेतकऱ्यांनी स्वाक्षऱ्यांद्वारे पाठिंबा दिला आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
आता कारंजा तालुक्यातील पावसाची स्थिती, पिकांचे संभाव्य नुकसान आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा शासनाकडून कसा विचार केला जातो, याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तातडीने दुष्काळ जाहीर करून मदत आणि आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.



