धामणगाव रेल्वेत श्याम भक्तीचा अभूतपूर्व जागर

युवतींच्या पुढाकारातून प्रथमच झुले श्याम संग सखियां भजनसंध्या; हजारो श्यामप्रेमी भाविकांची उपस्थिती
धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी संतोष वाघमारे
धामणगाव रेल्वे नगरीत भक्तीचा अभूतपूर्व जागर पाहायला मिळाला. युवतींच्या पुढाकारातून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या झुले श्याम संग सखियां या भव्य श्याम भजनसंध्येला हजारो श्यामप्रेमी भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. हारे का सहारा, बाबा श्याम हमारा या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला.
धामणगाव रेल्वे येथील गिरधारीलाल पसारी धर्मशाळेत लाडलियां खाटू वाले की यांच्या वतीने झुले श्याम संग सखियां या संकल्पनेवर आधारित भव्य श्याम भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे शहरात प्रथमच युवतींच्या ग्रुपने पुढाकार घेत या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले.

आदर्श दाधीच आणि हिमांशू सोनी यांच्या भजनांनी रंगली मैफल
या भजनसंध्येत प्रसिद्ध भजन गायक आदर्श दाधीच आणि हिमांशू सोनी यांनी सादर केलेल्या सुमधुर भजनांनी भाविकांना भक्तिरसात तल्लीन केले. एकापेक्षा एक भक्तिमय भजनांनी वातावरण भारावून गेले.
बाबा श्याम यांचा आकर्षक फुलांनी केलेला शृंगार, विद्युत रोषणाई आणि मनमोहक श्याम दरबार हे भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले. दरबाराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
खासदार अमर काळे यांची उपस्थिती
या भव्य भक्तिमय सोहळ्याला खासदार अमर काळे यांनी पत्नीसह उपस्थित राहून बाबा श्याम यांचे दर्शन घेतले. युवतींच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
भजनांच्या तालावर भाविकांनी नाचत-गात बाबा श्यामचा जयघोष केला. महिला, युवती आणि श्यामप्रेमी भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
महाआरतीने भक्तिमय सोहळ्याची सांगता
भजनसंध्येच्या अखेरीस विधिवत महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी आरतीमध्ये सहभागी होत बाबा श्याम यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
युवतींच्या पुढाकारातून साकारलेल्या या भव्य श्याम भजनसंध्येमुळे धामणगाव रेल्वे शहरात भक्तीचा जागर झाला. हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, सुमधुर भजने, आकर्षक श्याम दरबार आणि भक्तिमय वातावरणामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे.



