जळगावात सव्वा कोटींची ५ किलो MD पावडर जप्त; दोघांना अटक

मेहरुण आणि उस्मानिया पार्क परिसरात पोलिसांचा छापा; मीरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखा युनिट-४ ची मोठी कारवाई
जळगाव : जळगावात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५ किलो MD पावडर जप्त केली आहे. या MD पावडरची अंदाजे किंमत सव्वा कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मेहरुण आणि उस्मानिया पार्क परिसरात ही कारवाई करण्यात आली. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकत ही मोठी कारवाई केली.
या प्रकरणात रहिम ताहेर पिंजारी आणि सैय्यद मुशादूर अली मुमताज अली या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल पाच किलो MD पावडर जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची बाजारातील किंमत सुमारे सव्वा कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या कारवाईकडे पोलिसांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक म्हणून पाहिले जात आहे.
या MD पावडरचा पुरवठा कुठून करण्यात आला होता, ती नेमकी कोणाला वितरित केली जाणार होती आणि या अमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
जळगावात एवढ्या मोठ्या प्रमाणात MD पावडर जप्त झाल्याने अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.



