AmravatiBreakingNewscitynewsCityNewsImpactMaharashtraNews

अमरावती स्त्री रुग्णालयातील आगीचा तांत्रिक तपास वेगात

व्हेंटिलेशनमधील स्फोटाचे गूढ उलगडणार; फॉरेन्सिक आणि महावितरणच्या पथकांकडून घटनास्थळाची पाहणी

अमरावतीच्या स्त्री रुग्णालयात घडलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर प्रशासनाने तपासाला वेग दिला आहे. या दुर्घटनेत एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. व्हेंटिलेशनमधील नेमका स्फोट कशामुळे झाला, आग कशी लागली आणि आगीचा प्रसार कशा पद्धतीने झाला, याचा आता तांत्रिक पद्धतीने तपास केला जात आहे.

अमरावतीच्या स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीने संपूर्ण शहराला हादरवून सोडले. या दुर्घटनेत एका चिमुकल्याचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने तांत्रिक तपास सुरू केला आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी डॉक्टर आणि विविध तांत्रिक पथकांसह घटनास्थळाची पाहणी केली. रुग्णालयातील व्हेंटिलेशनमधील झालेला स्फोट नेमका कशामुळे झाला, त्यानंतर आग कशी लागली आणि आगीचा प्रसार कशा पद्धतीने झाला, याचा बारकाईने तपास करण्यात आला.

या तपासासाठी फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून काही नमुने घेण्यात आले असून, हे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. या अहवालातून आग लागण्यामागचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, आग लागण्यामागे विद्युत बिघाडाचा काही संबंध आहे का, याचाही तपास करण्यात आला. यासाठी महावितरणच्या अभियंत्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते. रुग्णालयातील वीजपुरवठा कशा पद्धतीने होतो आणि विद्युत यंत्रणा व्यवस्थित कार्यरत होती का, याचीही पाहणी करण्यात आली.

यासोबतच रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणेकडेही प्रशासनाने विशेष लक्ष दिले. आगीच्या वेळी पाण्याची स्प्रिंकलर यंत्रणा कार्यरत झाली होती का, ती योग्य पद्धतीने सुरू होती का आणि अग्निसुरक्षेच्या इतर यंत्रणा व्यवस्थित कार्यरत होत्या का, याची संपूर्ण पाहणी उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी केली.

यावेळी तहसीलदार विजय लोखंडे आणि गाडगे नगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोरखनाथ जाधव उपस्थित होते. तसेच स्त्री रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे शल्यचिकित्सक डॉ. अमोल नरोटे, उपाधीक्षक डॉ. मंगेश मेंढे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि तांत्रिक पथकही उपस्थित होते.

या दुर्घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतक मुलाचे वडील स्वप्निल बोरगे यांनी सिटी न्यूजशी बोलताना आग लागली त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती आणि त्यानंतर कुटुंबावर काय परिस्थिती ओढवली, याबाबत प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मृतक मुलाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा करत त्यांचे सांत्वन केले.

आता या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी समिती पुढील तपास करणार आहे. घटनास्थळावरून घेण्यात आलेले नमुने, फॉरेन्सिक तपासणी, विद्युत यंत्रणेची पाहणी आणि अग्निसुरक्षा यंत्रणेच्या तपासातून या दुर्घटनेमागचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे

अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील या गंभीर दुर्घटनेनंतर प्रशासनाने तांत्रिक तपासाला सुरुवात केली आहे. मेंटिलेशनमधील स्फोटाचे नेमके कारण काय होते, विद्युत यंत्रणेत काही बिघाड होता का आणि अग्निसुरक्षा यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत होती का, याचा तपास समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या चौकशीतून सत्य समोर येऊन भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button