पालकांनी पाल्यांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे : दादाजी भुसे

जिल्हा परिषद कन्या शाळेत देशभक्ती गीतांवर विद्यार्थिनींच्या उत्कृष्ट कवायती; गुणवंत विद्यार्थिनींसाठी १ लाख रुपयांचा प्रोत्साहन निधी
अमरावती | प्रतिनिधी
विद्यार्थी हे देशाचे भविष्यातील सुजाण नागरिक आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनातील इतर गोष्टींमध्ये तडजोड केली तरी पाल्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी पालकांना केले. अमरावती शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट देऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शाळेला आवश्यक सुविधांसाठी शासनाचे सहकार्य
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमानंतर मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील शैक्षणिक आणि इतर सुविधांची पाहणी केली.
शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच मुलींना स्वसंरक्षणाचे धडे आणि सैनिकी प्रशिक्षण दिले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कला आणि क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी कौतुकाने नमूद केले.
शाळा आणि परिसर स्वच्छ व सुंदर असून, आवश्यक त्या अतिरिक्त सुविधांसाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही भुसे यांनी दिली.
गुणवंत विद्यार्थिनींसाठी १ लाखांचा निधी
कन्या शाळेतील गुणवंत विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून १ लाख रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केली.
विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करून आई-वडील, गुरुजन, कुटुंब, गाव, राज्य आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
देशभक्ती गीतांवर विद्यार्थिनींच्या आकर्षक कवायती
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी विविध देशभक्ती गीतांवर आकर्षक कवायती सादर केल्या. ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’ तसेच ‘मेरा देश मेरा मुल्क, मेरा ये वतन’ यांसारख्या देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण केले.
या कवायतींना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
गुणवंत विद्यार्थिनी आणि माजी सैनिकांचा सत्कार
विविध परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या श्रावणी सोनोने, जाणीव नंदेश्वर, अंतरा वाट आणि अनुष्का सूर्यवंशी या विद्यार्थिनींचा मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक गजानन पवार, सुदाम वानखडे आणि श्रीराम मकेश्वर तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक नारायणराव वानखडे यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, मुख्याध्यापक बाळकृष्ण आंधळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
वंदे मातरम् आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



