citynewsLatest NewsMaharashtraMaharashtraGovernmentPune

पुण्यात एफडीएची मोठी कारवाई; आठ लाखांहून अधिक किमतीचा खाद्यसाठा जप्त

लेबलिंगमधील अनियमितता व भेसळीच्या संशयावर छापा; प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई

पुणे | प्रतिनिधी

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील बी. जी. गोयल अँड कंपनी येथे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत सुमारे ८ लाख १४ हजार रुपयांहून अधिक किमतीचा खाद्यसाठा जप्त केला आहे. लेबलिंगमधील अनियमितता आणि भेसळीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या परिसराची तपासणी करत ‘संत’ आणि ‘साधू’ ब्रँडच्या हळद पावडर, तिळ तसेच सोयाबीन चंक्सचे नमुने तपासणीसाठी घेतले. तपासादरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला.

या कारवाईत एकूण ४ हजार १७२ किलो खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ८ लाख १४ हजार रुपयांहून अधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जप्त केलेल्या खाद्यपदार्थांपैकी चार नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.

प्राथमिक तपासात उत्पादनांच्या लेबलिंगमध्ये अनियमितता आढळल्याबरोबरच अन्न सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन करण्यात आले नसल्याचे आणि परवान्यात आवश्यक बदल न केल्याचेही समोर आल्याची माहिती एफडीएने दिली आहे.

दरम्यान, संबंधित कंपनीला पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या कारवाईचा संबंध काही वृत्तांमध्ये चर्चेत असलेल्या इतर प्रकरणांशी जोडला जात असला, तरी एफडीएची सद्य कारवाई अन्न सुरक्षा नियमांचे पालन आणि खाद्यपदार्थांच्या तपासणीच्या अनुषंगाने करण्यात आली असून, पुढील कारवाई प्रयोगशाळेच्या अहवालावर अवलंबून राहणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button