citynewsLatest NewsMaharashtraNagpur graminramtek

रामटेक गड मंदिराच्या विकासाला गती; श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयकास विधिमंडळाची मंजुरी

व्यवस्थापनात पारदर्शकता, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार

रामटेक | प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या रामटेक गड मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयकाला महाराष्ट्र विधिमंडळाची मंजुरी मिळाल्याने मंदिराच्या व्यवस्थापन आणि विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे मंदिराचे जतन, संवर्धन आणि भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रामटेक तालुक्यातील प्राचीन भोसले देवस्थान अर्थात रामटेक गड मंदिरासाठी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारातून श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आले.

रामटेक येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आशिष जयस्वाल यांनी या निर्णयाची माहिती दिली. त्यांच्या मते, ट्रस्टच्या स्थापनेमुळे मंदिराच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता येईल तसेच विकासकामे अधिक नियोजनबद्ध आणि प्रभावीपणे राबविणे शक्य होईल.

या ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, भाविकांसाठी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे तसेच धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध विकासकामे हाती घेतली जाणार आहेत.

विदर्भातील प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या रामटेक गड मंदिराच्या संवर्धनासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ट्रस्टच्या स्थापनेमुळे मंदिराचा दीर्घकालीन विकास अधिक सक्षमपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिक आणि भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे रामटेकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button