बडनेऱ्यात बहुप्रतीक्षित फूट ओव्हरब्रिजच्या गर्डरची यशस्वी उभारणी

जुनी वस्ती, चमन नगर आणि अलमास गेट परिसरातील नागरिकांना लवकरच दिलासा; प्रकल्प निर्णायक टप्प्यात
अमरावती | प्रतिनिधी
बडनेरा शहरातील जुनी वस्ती, चमन नगर आणि अलमास गेट परिसराला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित फूट ओव्हरब्रिज प्रकल्पाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पुलाच्या मुख्य संरचनेचा भाग असलेल्या विशाल गर्डरची उभारणी रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या कामामुळे परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फूट ओव्हरब्रिजच्या उभारणीसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. गर्डर बसविण्याचे काम सुरळीत आणि सुरक्षितरीत्या पार पडावे यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष नियोजन केले होते. कामादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनमंत ऊरलगोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
गर्डर उभारणीचा महत्त्वाचा टप्पा पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक नागरिकांनी या पुलामुळे रेल्वे मार्ग आणि महामार्ग ओलांडताना होणारा धोका कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक अजय जैस्वाल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा फूट ओव्हरब्रिज परिसरातील नागरिकांसाठी सुरक्षिततेचा नवा आधार ठरेल. विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हा पूल अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार रवी राणा यांचे आभार व्यक्त केले. पुलाचे उर्वरित बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जुनी वस्ती, चमन नगर आणि अलमास गेट परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होणार असून, बडनेरा शहराच्या विकासात या प्रकल्पाची महत्त्वपूर्ण भर पडणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
फूट ओव्हरब्रिजच्या गर्डरची उभारणी पूर्ण झाल्याने प्रकल्प आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. उर्वरित कामे लवकर पूर्ण होऊन हा पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होण्याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



