AmravaticitynewsLatest NewsMaharashtraMaharashtraPoliticspolitics

आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल

प्रहार हॉकर्स युनियनच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन; रक्तदान, दिव्यांगांना साहित्य, विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ताडपत्री वाटप

अमरावती | प्रतिनिधी

आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रहार हॉकर्स युनियनच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन, रक्तदान शिबिर, दिव्यांगांना साहित्य वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू कुटुंबांना ताडपत्री वाटप अशा विविध उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.

५ जुलै रोजी पंचवटी चौक येथे प्रहार हॉकर्स युनियनच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शेकडो हॉकर्स उपस्थित होते. प्रहार हॉकर्स युनियनचे शहराध्यक्ष गणेश मारोटकर, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

प्रहारचे महानगर प्रमुख बंटीभाऊ रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त सामाजिक उत्तरदायित्व जपत विविध जनहिताचे उपक्रम राबविण्यात आले.

सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमात भव्य रक्तदान शिबिर पार पडले. तसेच दिव्यांग नागरिकांना आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले.

याशिवाय दहावी आणि बारावी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गरजू कुटुंबांना ताडपत्री वाटप करून त्यांच्या दैनंदिन अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे आमदार बच्चू कडू यांची रक्ततुला. रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आमदार बच्चू कडू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त आयोजित समाजोपयोगी उपक्रमांमुळे हा कार्यक्रम केवळ उत्सव न ठरता सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा संदेश देणारा ठरला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button