BhandaracitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

भंडाऱ्यात वनविभागाची धडक कारवाई; चितळाचे मांस, पॅंगोलिनचे १५० खवले जप्त

दहेगाव येथे छापा; भरमार बंदूक, मोराचे अवशेषही हस्तगत, एक आरोपी ताब्यात

भंडारा | प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर वनविभागाने वन्यजीव शिकारी आणि तस्करीविरोधात मोठी कारवाई करत दहेगाव येथे एका घरावर छापा टाकला. या कारवाईत चितळाचे मांस, संरक्षित इंडियन पॅंगोलिन (खवले मांजर) या वन्यप्राण्याचे तब्बल १५० खवले, भरमार बंदूक तसेच इतर वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लाखांदूर वनपरिक्षेत्रातील दहेगाव येथे नाजूक रूपचंद डोंगरवार यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. झडतीदरम्यान वनअधिकाऱ्यांना अनेक संशयास्पद वस्तू आढळून आल्या.

कारवाईत सुमारे एक किलो शिजवलेले चितळाचे मांस जप्त करण्यात आले. याशिवाय शिकारीसाठी वापरली जात असल्याचा संशय असलेली भरमार बंदूकही हस्तगत करण्यात आली.

झडतीदरम्यान सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे संरक्षित वन्यप्राणी इंडियन पॅंगोलिनचे १५० खवले आढळून आले. तसेच राष्ट्रीय पक्षी मोराचे दोन पाय आणि इतर वन्यजीवांचे अवशेषही जप्त करण्यात आले.

वनविभागाने तात्काळ संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन सर्व मुद्देमाल पंचनाम्यानंतर जप्त केला. आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

प्राथमिक तपासात या प्रकरणाचा संबंध वन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी करणाऱ्या मोठ्या नेटवर्कशी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अनुषंगाने वनविभाग इतर संशयितांचा शोध घेत असून तपास अधिक गतीने सुरू आहे.

वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित प्राण्यांची शिकार आणि तस्करी हा गंभीर गुन्हा मानला जातो. लाखांदूर वनविभागाच्या या कारवाईमुळे वन्यजीव गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून, तपासातून आणखी महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button