BhandaracitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

रामपुरीतील तरुणीला मारहाणीचा आरोप; पीडित कुटुंबीयांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी

गंभीर जखमी झाल्याचा दावा; केवळ एनसीआर नोंदवल्याचा पोलिसांवर आरोप

भंडारा | प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील रामपुरी येथे 19 वर्षीय तरुणीला कथितरीत्या मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला असून, प्रकरणात कठोर कारवाई न झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत झालेल्या किरकोळ वादातून संबंधित तरुणीचे केस ओढून तिच्या मान, पाठ आणि शरीराच्या विविध भागांवर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत जखमी झालेल्या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

पीडितेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर पालांदूर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, इतक्या गंभीर प्रकरणात केवळ एनसीआर (अदखलपात्र गुन्हा) नोंदविण्यात आला असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

तक्रार नोंदविताना पीडितेचे संपूर्ण म्हणणे नोंदविण्यात आले नसल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे. वडिलांचे छत्र नसलेल्या या तरुणीला न्याय मिळवण्यासाठी आई आणि आजीसह विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आरोपीला तातडीने अटक करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे.

या प्रकरणावर पालांदूर पोलिसांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासन पुढे कोणती कारवाई करते आणि पीडितेला न्याय कधी मिळतो, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button