यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; बस-ट्रकच्या धडकेत 4 ठार, 25 प्रवासी जखमी

आग्रा ते नोएडा मार्गावरील यमुना एक्सप्रेसवेवर सोमवारी मध्यरात्रीनंतर साडेतीन वाजताच्या सुमारास भीषण रस्ता अपघात झाला. राया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माइलस्टोन क्रमांक 111 जवळ एका खासगी बसची ट्रकला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात सुमारे 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी एका प्रवाशाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चार जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. या दुर्घटनेशी संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी पोलीसांकडून केली जात आहे.



