फुटाळा तलाव परिसरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; सात जण पोलिसांच्या ताब्यात

चाकू, दगड व विटांनी हल्ला; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी, चार विधीसंघर्ष बालकांचाही समावेश
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा तलाव परिसरात किरकोळ वादाचे भीषण हत्याकांडात रूपांतर झाले. दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन मुख्य आरोपींसह चार विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन उर्फ असद खान, मयूर जाधव आणि त्यांचे मित्र फुटाळा तलाव परिसरात भुट्टे खात बसले असताना मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे तेथे आला. यावेळी दोन्ही गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर योगेंद्र उर्फ लाला पांडे याने आपल्या साथीदारांना घटनास्थळी बोलावल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याचा भाऊ जितेंद्र उर्फ जंगली पांडे, दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता तसेच चार विधीसंघर्ष बालकांनी मिळून अमन उर्फ असद खान, मयूर जाधव आणि त्यांच्या मित्रांवर चाकू, दगड, विटा तसेच हाताबुक्क्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या हल्ल्यात अमन उर्फ असद खान यांचा मृत्यू झाला, तर मयूर जाधव गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर काही तरुणांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी योगेंद्र उर्फ लाला पांडे याला ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने जितेंद्र उर्फ जंगली पांडे आणि दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता यांनाही अटक केली. या प्रकरणातील चार विधीसंघर्ष बालकांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, योगेंद्र उर्फ लाला पांडे आणि जितेंद्र उर्फ जंगली पांडे या दोघांवर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत. तसेच जितेंद्र पांडे याच्यावर यापूर्वी एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेमुळे नागपूर शहरात खळबळ उडाली असून हल्ल्यामागील नेमके कारण, इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग आणि घटनेतील सर्व पैलूंचा सखोल तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहेत.



