येडशी शिवारात एकाच ठिकाणी तीन सापांचे दर्शन; व्हिडिओ चर्चेत

झरी तालुक्यातील दुर्मिळ दृश्य; वन विभागाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
यवतमाळ | प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील येडशी शिवारात एका नाल्यामध्ये एकाच वेळी तीन साप दिसल्याची दुर्मिळ घटना समोर आली आहे. हा प्रकार तेथील एका शेतकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला असून संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेनंतर वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येडशी गावातील शेतकरी संघर्ष भगत हे आपल्या शेतालगत असलेल्या नाल्याकडे गेले असता त्यांना एकाच ठिकाणी तीन साप हालचाल करताना दिसले. अचानक समोर आलेले हे दृश्य पाहून त्यांनी सुरक्षित अंतर राखत मोबाईलद्वारे त्याचे चित्रीकरण केले.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर परिसरात कुतूहलासोबतच काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन्यजीव तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सापांच्या प्रजनन काळात मादी सापाच्या वासामुळे अनेक नर साप एकाच ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता असते. ग्रामीण भागात या नैसर्गिक प्रक्रियेला स्थानिक भाषेत ‘सापांची लाग’ असे म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते हे दृश्य दुर्मिळ असले तरी ते नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे.
वन विभागाने नागरिकांना साप दिसल्यास घाबरून न जाण्याचा आणि त्यांना कोणताही त्रास न देण्याचा सल्ला दिला आहे. शेतात काम करताना जाड बूट परिधान करावेत, हातात काठी ठेवावी, गवत किंवा झुडपांमध्ये हात घालताना विशेष काळजी घ्यावी तसेच साप आढळल्यास तत्काळ वन विभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्यात सापांची हालचाल वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता बाळगावी, असेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे.



