citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur graminNagpurCrimeNagpurPolice

रामटेक तालुक्यात आईची दगडाने हत्या; मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात

रयतवाडी येथील धक्कादायक घटना; आरोपी मानसिक आजाराने त्रस्त असल्याची प्राथमिक माहिती

रामटेक | प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील रयतवाडी गावात आईची तिच्याच मुलाकडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात 50 वर्षीय किसणीबाई जोधराम इनवाते यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा आरोप असून, पोलिसांनी त्यांचा मुलगा कैलास जोधराम इनवाते याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी काही काळापासून मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जात असून, याबाबतचा तपास सुरू आहे.

ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यावेळी मृत महिलेचे पती आणि दोन्ही मुली शेतात कामासाठी गेले होते. घरात किसणीबाई एकट्याच असताना आरोपी मुलाने त्यांच्या डोक्यावर मोठा दगड आपटल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

स्थानिकांच्या माहितीनुसार, आरोपी गेल्या दोन वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होता. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे रयतवाडी गावात हळहळ व्यक्त होत असून, देवलापार पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. तपासानंतरच हत्येमागील नेमके कारण आणि आरोपीच्या मानसिक स्थितीबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button