AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

गुजराती एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत विक्रमी मतदान; निलेश लाठिया अध्यक्ष, डॉ. नितीन सेठ उपाध्यक्ष

390 पैकी 327 सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क; नव्या नेतृत्वाकडून विकासाच्या अपेक्षा

अमरावती | प्रतिनिधी

अमरावतीतील प्रतिष्ठित गुजराती एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत यंदा सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विक्रमी मतदानाची नोंद केली. एकूण 390 मतदारांपैकी तब्बल 327 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत अध्यक्षपदी निलेश लाठिया, तर उपाध्यक्षपदी डॉ. नितीन सेठ यांची निवड झाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची संस्था असलेल्या गुजराती एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीकडे सदस्यांचे विशेष लक्ष लागले होते. रविवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनंतर तत्काळ मतमोजणी करण्यात आली आणि सायंकाळपर्यंत निकाल जाहीर करण्यात आले.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निलेश लाठिया यांनी 171 मते मिळवत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी दिलीप पोपट यांना 143 मते, तर धीरेंद्र आडतिया यांना 9 मते मिळाली.

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. नितीन सेठ यांनी 170 मते मिळवत विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी ॲड. संजय सांघानी यांना 153 मते मिळाली. या निवडणुकीत 27 मते अवैध ठरल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

कार्यकारिणीच्या निवडणुकीत राजेश पटेल, दिनेश सेठिया, भरत भायानी, चेतन लाठिया, तुषार श्राफ, जीतू दोशी, मुकेश गगलानी, किशोर कारिया, निलेश शाह, राजू देसाई, सीमेश श्राफ आणि अमृत पटेल यांची निवड करण्यात आली.

या निवडणुकीत सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत संस्थेच्या लोकशाही परंपरेवर विश्वास व्यक्त केला. नव्या नेतृत्वाकडून शैक्षणिक गुणवत्ता, संस्थेचा सर्वांगीण विकास आणि विविध उपक्रमांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button