AkolacitynewsLatest NewsMaharashtra

काटेपूर्णा नदीत बुडून युवकाचा मृत्यू; बचाव पथकाने काही मिनिटांत मृतदेह बाहेर काढला

बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथील घटना; शोध व बचाव पथकाच्या तत्पर कारवाईचे कौतुक

अकोला | प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथे काटेपूर्णा नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या ३५ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम राबवत काही मिनिटांत नदीच्या तळाशी अडकलेला मृतदेह बाहेर काढला.

शनिवारी दोनद येथील आसरा माता देवस्थान परिसरात ही घटना घडली. सीरसो गायरान येथील रहिवासी ज्ञानेश्वर दादाराव सोळंके (वय ३५) हे कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर त्यांनी मंदिरालगत असलेल्या काटेपूर्णा नदीत आंघोळीसाठी प्रवेश केला.

प्राथमिक माहितीनुसार, दोरखंडाच्या साहाय्याने नदीचा एक काठ गाठल्यानंतर परत येत असताना नदीच्या मध्यभागी त्यांचा तोल गेला आणि ते खोल पाण्यात बुडाले. काही क्षणांतच ते पाण्याखाली गेल्याने नातेवाईकांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलिसांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून तातडीने शोधमोहीम सुरू केली.

नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाहामुळे शोधकार्य आव्हानात्मक ठरत असतानाही प्रशिक्षित जवानांनी विशेष शोध तंत्राचा वापर करून ट्रेसिंग ऑपरेशन राबविले. अवघ्या काही मिनिटांत नदीच्या तळाशी अडकलेला मृतदेह शोधून बाहेर काढण्यात पथकाला यश आले.

या मोहिमेत मयूर सळेदार, शेखर केवट, रोशन सपकाळ, अक्षय भड, साहील देशमुख, सचिन कुकडे, पवन भड आणि हर्षल वानखडे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

दरम्यान, पिंजर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नदी, तलाव आणि इतर पाणीसाठ्यांमध्ये आंघोळ किंवा पोहण्यासाठी उतरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button