‘ऑपरेशन शोध’ची मोठी कामगिरी; १५ दिवसांत ६० अल्पवयीन मुलींची सुटका

यवतमाळ जिल्ह्यात अजूनही २० मुली बेपत्ता; अनेक मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी, मागास भागांतील प्रकरणे चिंताजनक
यवतमाळ | प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन शोध’ या विशेष मोहिमेमुळे अवघ्या १५ दिवसांत ६० अल्पवयीन मुलींना सुरक्षितपणे शोधून त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांच्या नोंदीनुसार अजूनही २० मुलींचा शोध लागलेला नसल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान कायम आहे.
जिल्ह्यातील अनेक अल्पवयीन मुली या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यांच्या बळी ठरल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. मुलींना प्रेमाचे आमिष, नोकरीची खोटी आश्वासने किंवा इतर प्रलोभने दाखवून त्यांचे अपहरण केल्याची अनेक प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक स्तरावरही चिंता व्यक्त होत आहे.
‘ऑपरेशन शोध’ अंतर्गत पोलिसांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या बेपत्ता व अपहरणाच्या गुन्ह्यांचा सखोल आढावा घेतला. विशेषतः वडकी, कळंब, दारव्हा, दिग्रस, महागाव, घाटंजी, पुसद, आर्णी, राळेगाव, बाभुळगाव, नेर, दराटी, खंडाळा आणि उमरखेड या मागास व ग्रामीण भागांतील प्रकरणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या भागांतून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे तपासात आढळून आले.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, माहितीदारांचे जाळे आणि विविध राज्यांतील पोलिसांशी समन्वय साधत व्यापक शोधमोहीम राबविली. या मोहिमेमुळे अनेक मुलींना सुरक्षित परत आणण्यात यश मिळाले. मात्र, अजूनही बेपत्ता असलेल्या २० मुलींचा शोध सुरू असून त्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.
दरम्यान, महिलांवरील अत्याचार आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सामाजिक संस्था, पालक आणि नागरिकांनी मुलांवर सतत लक्ष ठेवण्याबरोबरच संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण व मागास भागांमध्ये जनजागृती, शालेय विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि सायबर माध्यमांद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत जागरूकता वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.
जिल्हा पोलिस प्रशासनाने ‘ऑपरेशन शोध’ पुढेही सुरू ठेवत प्रत्येक बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.



