अवैध रेती वाहतुकीवर धारणी पोलिसांचा मोठा प्रहार

ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ६.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त; चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
धारणी | प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात पुन्हा एकदा धडक कारवाई करत ट्रॅक्टर-ट्रॉलीसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धारणी पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी वाहन चालकासह ट्रॅक्टर मालकाविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे तसेच अवैध गौण खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १६ जून २०२६ रोजी धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांना कारादा गावाजवळील पाटिया रोड परिसरातून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचला. पाहणीदरम्यान एका ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये रेती भरलेली आढळून आली. वाहन चालकाकडे रेती वाहतुकीचा वैध परवाना तसेच वाहनासंबंधी आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, चालकाकडे कोणतेही वैध दस्तावेज नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.
चौकशीदरम्यान चालक संजय बाबुलाल बेठेकर (वय २९, रा. चाकरदा) याने संबंधित ट्रॅक्टर हा रुपला कासदेकर (वय ४५, रा. पोटीलावा, ता. धारणी) यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. तसेच मालकाच्या सूचनेनुसारच रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
पंचनामा आणि पाहणीत ट्रॅक्टरमध्ये सुमारे एक ब्रास रेती, अंदाजे किंमत ८ हजार रुपये, शेंदरी रंगाचा कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच २७ बीझेड २९३६, अंदाजे किंमत ५ लाख रुपये आणि लाल रंगाची विनानंबर ट्रॉली, अंदाजे किंमत १ लाख ५० हजार रुपये असा एकूण ६ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ९ व १५, सार्वजनिक संपत्ती अधिनियम १९८४ चे कलम ३ व ७ तसेच मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १३०(१)/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज लढे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
दरम्यान, अवैध रेती वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असून पर्यावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची बाब वारंवार समोर येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.



