AMCActionAmravatiamravatiAmravatiCorporationAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationamravatinewsBreakingNewscitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत अतिक्रमणांवर मनपाचा बुलडोझर! तीन दिवसांत 30 अतिक्रमणे हटवली; एक ट्रक भंगार जप्त

अमरावती शहरात गेल्या तीन दिवसांपासून अतिक्रमणधारकांविरोधात महानगरपालिका प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानंतर पोलीस विभाग आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करत शहरातील प्रमुख चौक आणि बाजारपेठांमधील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत तब्बल 25 ते 30 अतिक्रमणे हटविण्यात आली असून एक ट्रक भरून भंगार साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अमरावती शहरातील राजकमल चौक, श्याम चौक, तहसील कार्यालय परिसर, जवाहर गेट, इतवारा बाजार आणि शनी मंदिर परिसरात आज सकाळपासून अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली.

महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार पोलीस विभाग आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. शहरातील महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या भागांमध्ये रस्ते व पदपथांवर अतिक्रमण करून बसलेल्या घुमंतू विक्रेत्यांवर आणि अनधिकृत साहित्य ठेवणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली.

या मोहिमेदरम्यान सुमारे 25 ते 30 अतिक्रमणे हटविण्यात आली. तसेच सार्वजनिक जागांवर साठवून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेले भंगार साहित्य एक ट्रक भरून कंपोस्ट डेपो येथे जमा करण्यात आले आहे.

रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवणे, वाहतुकीतील अडथळे दूर करणे आणि नागरिकांना सुरक्षित तसेच स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मात्र या कारवाईनंतर शहरातील नागरिकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारच्या मोहिमा यापूर्वीही राबविण्यात आल्या, अतिक्रमणे हटविण्यात आली, मात्र काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणांचे साम्राज्य उभे राहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

त्यामुळे केवळ कारवाई करून प्रश्न सुटणार नसून अतिक्रमण पुन्हा होणार नाही यासाठी कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मनपा प्रशासनाने अतिक्रमणविरोधी मोहीम सायंकाळपर्यंत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले असून या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

आता ही मोहीम तात्पुरती ठरणार की शहराला खऱ्या अर्थाने अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासन दीर्घकालीन उपाययोजना करणार, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button