पेट्रोल-डिझेलला पर्याय सायकलचा! अमरावतीत जागतिक सायकल दिनानिमित्त भव्य रॅली; पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश

अमरावती शहरात जागतिक सायकल दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारी भव्य सायकल रॅली उत्साहात पार पडली. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या मेरा युवा भारत (माय भारत) उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेकडो सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
‘पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा’ या नेशन फर्स्ट चॅलेंज मोहिमेअंतर्गत आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे, वाढते प्रदूषण कमी करणे आणि नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.
सकाळी सात वाजता जिल्हा स्टेडियम येथून मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. जिल्हा स्टेडियमवरून निघालेली ही रॅली इर्विन चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, पुन्हा इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल मार्गे कलेक्टर परिसर आणि सर्किट हाऊस परिसरातून अमरावती ग्रामीण पोलीस ग्राउंड येथे पोहोचली. तेथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
या रॅलीत विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सायकलिंगप्रती असलेले आकर्षण आणि पर्यावरणाबद्दलची जबाबदारी यामुळे संपूर्ण मार्गावर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सहभागी नागरिकांनी पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि फिटनेसचा संदेश देणारे फलक हातात घेऊन जनजागृती केली.
या उपक्रमाचे आयोजन माय भारत अमरावती, महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त कार्यालय, ग्रामीण पोलीस प्रशासन आणि अमरावती सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अतुल कलमकर, डॉ. कुलकर्णी यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सायकलचा वापर वाढविण्याचे आवाहन करत, पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात छोट्या-छोट्या सवयी बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. सायकल ही केवळ वाहतुकीचे साधन नसून आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीसाठी प्रभावी माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित या भव्य रॅलीने ‘फिट इंडिया, हेल्दी इंडिया आणि ग्रीन इंडिया’चा संदेश प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवला. बदलाची सुरुवात स्वतःपासून करत शक्य तेथे सायकलचा वापर वाढवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



