नांदेडमध्ये वीजेचा कहर; बोळसा येथे ८ शेळ्या आणि गायीचा मृत्यू, शेतकऱ्यावर आर्थिक संकट
नांदेड, प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज कोसळून आठ शेळ्या आणि एका गायीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरी तालुक्यातील बोळसा गावचे शेतकरी संतोष चिकटवाड हे आपल्या जनावरांना शेतात चारत होते. दरम्यान, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असताना अचानक आकाशातून वीज कोसळली. या दुर्घटनेत आठ शेळ्या आणि एक गाय जागीच दगावल्या.
सुदैवाने शेतकरी संतोष चिकटवाड हे या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. मात्र त्यांच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीबाबत प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे जनजीवन विस्कळीत होत असून शेतकरी वर्ग चिंतेत आहे. अशा घटनांमुळे पशुधनासह शेतीचेही मोठे नुकसान होत असल्याने प्रशासनाने तातडीने मदतीचे उपाय हाती घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



