AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाचे आवाहन

सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींसाठी असलेल्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र आणि गरजू विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनातर्फे निवासासह सर्व आवश्यक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये इयत्ता आठवी ते दहावी, कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट डाऊनलोड करून संबंधित वसतिगृहात ऑफलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक राहणार आहे.

मुलांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाचे युनिट क्रमांक १, २, ३ आणि निंभोरा येथील वसतिगृह, तसेच संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह उपलब्ध आहेत. तर मुलींसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, कॅम्प जेल रोड युनिट क्रमांक ४ आणि १२५वी जयंती वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे.

याशिवाय तालुकास्तरावरही इयत्ता आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. शालेय अभ्यासक्रम इयत्ता आठवी ते दहावीकरिता ३० जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालय आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १५ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी ०७२१-२६६१२६१ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा समाज कल्याण आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button