AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

वडिलांनी दिली स्वतःची किडनी; अमरावती सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये ७२ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अर्थात सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मानवी नात्याला भावनिक स्पर्श करणारी आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली आहे. वडिलांनी स्वतःची एक किडनी देऊन आपल्या मुलाचे प्राण वाचवले असून रुग्णालयात ७२ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.

२२ वर्षीय करण नक्कल बारंगे हा युवक काही महिन्यांपासून गंभीर किडनी आजाराने त्रस्त होता. मोर्शी तालुक्यातील पिंपरी येथील रहिवासी असलेल्या करणवर मागील काही महिन्यांपासून डायलिसिस सुरू होते. मात्र डायलिसिस हा कायमस्वरूपी उपाय नसल्याने डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला.

रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य आणि यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली. या रुग्णालयात केवळ विदर्भातूनच नव्हे तर इतर जिल्हे आणि राज्यांमधूनही रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे सांगण्यात आले.

मुलाच्या भविष्यासाठी आणि त्याला नवजीवन मिळावे या हेतूने वडील नक्कल श्रीराम बारंगे यांनी स्वतःची एक किडनी मुलाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डॉक्टरांच्या विशेष पथकाने करण बारंगे यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.

ही संपूर्ण शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबालाही मोठा दिलासा मिळाला आहे.

सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नेफरोलॉजिस्ट, युरो सर्जन, भूलतज्ञ, परिचारिका, समाजसेवा विभाग तसेच विविध वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.

या यशस्वी प्रत्यारोपणामुळे केवळ एका युवकाला नवजीवन मिळाले नाही, तर सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील विश्वासही अधिक दृढ झाला आहे. वडिलांच्या त्यागामुळे आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे करण बारंगे याला नव्या आयुष्याची संधी मिळाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button