महाराष्ट्रात मोठा पोलीस प्रशासकीय फेरबदल; 13 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे मोठे आदेश जारी केले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मंगळवारी 26 मे रोजी गृह विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी हे आदेश जारी केले.
या बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांच्या 21 मे रोजी झालेल्या बदल्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना नव्याने पदस्थापना देण्यात आली आहे. तर काही प्रतीक्षाधीन अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
बदलीच्या प्रतीक्षेत असलेले अरविंद चावरिया यांची मुंबई येथील राज्य राखीव पोलीस बलात पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राज्य पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी श्रीमती भागीरथी भरत पवार यांची छत्रपती संभाजीनगर शहरातील सहायक पोलीस आयुक्त पदावरून लातूर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षकपदी तत्काळ प्रभावाने बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई राज्य राखीव पोलीस बलातील विनिता साहू यांची नागपूरच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. तर नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सहसंचालक अरविंद साळवे यांची मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस उपमहानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
सागरी सुरक्षा आणि राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनाही मुंबई शहरात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय, ठाणे शहराचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांची नवी मुंबई येथे झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा ठाणे शहरातच नियुक्त करण्यात आले आहे. तसेच पुणे पीएमआरडीएचे पोलीस अधीक्षक अमोल झेंडे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरार येथे झालेली बदलीही रद्द करण्यात आली असून त्यांना पूर्वीच्या पदावर कायम ठेवण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या या व्यापक फेरबदलामुळे पोलीस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप झाले असून, कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.



