AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीच्या आदित्य कोहेकर यांची ‘युवा संगम – फेज ६’ साठी राष्ट्रीय स्तरावर निवड

अमरावती जिल्ह्यातील युवक आदित्य कोहेकर यांची भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा संगम – फेज ६’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. देशभरातून आलेल्या तब्बल १.३ लाखांहून अधिक अर्जांमधून त्यांची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातून निवडलेल्या केवळ ५० प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय व्यासपीठावर करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

‘युवा संगम – फेज ६’ हा कार्यक्रम १४ मे ते २२ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रासाठी या उपक्रमाची नोडल समन्वयक संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च अर्थात IISER पुणे होती, तर जोड संस्था म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात IIT तिरुपती कार्यरत होते. या अंतर्गत महाराष्ट्रातील निवडलेल्या प्रतिनिधींचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक दौरा आंध्र प्रदेश राज्यात आयोजित करण्यात आला होता.

‘युवा संगम’ हा उपक्रम देशातील युवकांमध्ये सांस्कृतिक एकात्मता, राष्ट्रीय ऐक्य आणि विविध राज्यांतील सामाजिक व प्रशासकीय रचनेची ओळख निर्माण करण्यासाठी राबवला जातो. अनुभवाधिष्ठित शिक्षणावर आधारित या कार्यक्रमात पाच प्रमुख घटकांवर विशेष भर दिला जातो.

यामध्ये पर्यटन अंतर्गत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट, परंपरा अंतर्गत स्थानिक कला, खाद्यसंस्कृती आणि वारशाची ओळख, प्रगती अंतर्गत विकास प्रकल्प आणि शासकीय संस्थांचा अभ्यास, प्रोद्योगिकी अंतर्गत तांत्रिक आणि संशोधन संस्थांशी संवाद, तसेच परस्पर संपर्कातून विविध राज्यांतील युवकांमध्ये संवाद आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याचे कार्य केले जाते.

या कार्यक्रमादरम्यान आदित्य कोहेकर यांना आंध्र प्रदेशचे माननीय राज्यपाल यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची विशेष संधी मिळाली. राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका, सांस्कृतिक ऐक्य, प्रशासन आणि भविष्यातील नेतृत्व या विषयांवर झालेला हा संवाद त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी आणि अविस्मरणीय अनुभव ठरला.

याबाबत बोलताना आदित्य कोहेकर यांनी सांगितले की, “युवासंगम हा माझ्या आयुष्यातील सर्वात अमूल्य अनुभवांपैकी एक आहे. महाराष्ट्र आणि माझ्या अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. देशाच्या विविध भागातील संस्कृती, प्रगती आणि प्रशासन यांची ओळख प्रत्यक्ष अनुभवातून झाली. तसेच आंध्र प्रदेशच्या माननीय राज्यपालांना भेटून संवाद साधण्याचा सन्मान हा माझ्या आयुष्यातील विशेष क्षण ठरला. हा उपक्रम राबवण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्रालय, भारत सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो.”

अमरावतीच्या युवकाची राष्ट्रीय स्तरावरील ही निवड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून विविध स्तरांतून आदित्य कोहेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button