अमरावती उत्सव मेळ्यात रक्तरंजित घटना; चाकू हल्ल्यात कोलकात्याच्या व्यापाऱ्याचा मृत्यू, शहरात खळबळ

अमरावती शहरातील सायन्सकोर मैदानावर सुरू असलेल्या अमरावती उत्सव मेळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेळ्यातील पार्टनर असलेल्या कोलकात्याचे ५३ वर्षीय अभिजीत कुमार कर यांचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून आरोपी अजीज खान युसूफ खान याने भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी दुपारच्या सुमारास सायन्सकोर मैदानावरील मेळा परिसरात आरोपी अजीज खान हा जेवण करत होता. त्यावेळी त्याचा अभिजीत कुमार कर यांच्याशी वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला. पोलिसांच्या माहितीनुसार, वादादरम्यान अभिजीत कर यांनी आरोपीला थप्पड मारली. त्याचा राग मनात धरून आरोपीने जवळच असलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने अभिजीत कर यांच्या कमरेवर वार केला.
या हल्ल्यानंतर मेळा परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या अभिजीत कर यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ८ मे रोजी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपी अजीज खान याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, घटनेत आणखी काही जणांचा सहभाग होता का, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर बजरंग दलासह विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या. ९ मे रोजी बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सायन्सकोर मैदानावर जाऊन घोषणाबाजी केली आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी मेळ्याचे प्रवेशद्वार काही काळ बंद ठेवून कडेकोट बंदोबस्त तैनात केला. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला.
अमरावती उत्सव मेळ्यात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. आता या प्रकरणात पुढील तपासातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



