बीडमध्ये दुर्दैवी घटना! कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा शॉक; 26 वर्षीय नजीर सय्यदचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.
घरातील कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा शॉक लागून 26 वर्षीय नजीर खदीर सय्यद या युवकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नजीर सय्यद हा बांधकाम मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
मंगळवारी (5 मे) सकाळी साडेआठच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे कामावर जाण्याची तयारी करत होता. याचवेळी घरातील लोखंडी कुलरमध्ये पाणी टाकत असताना अचानक कुलरमध्ये विजेचा प्रवाह उतरला आणि त्याला जोरदार विजेचा शॉक बसला.
शॉक इतका तीव्र होता की नजीर जागीच खाली कोसळला.
घरातील पत्नी आणि वडिलांनी आवाज ऐकताच तात्काळ धाव घेतली. त्यांनी सर्वप्रथम वीजपुरवठा बंद केला आणि नजीरला कुलरपासून दूर केले.
यानंतर नजीरला तातडीने घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविण्याचा सल्ला दिला. अंबाजोगाई ग्रामीण रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी नजीरला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नजीरच्या पश्चात पत्नी, अवघी आठ महिन्यांची चिमुकली मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने त्यांच्या समोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.
घटनेनंतर संपूर्ण घाटनांदूर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी विद्युत उपकरणे वापरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः कुलर, पंप, हीटर यांसारख्या उपकरणांमध्ये पाणी भरताना वीजपुरवठा पूर्णपणे बंद करणे, वायरिंगची नियमित तपासणी करणे आणि सुरक्षित साधनांचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.



