AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; प्रभाग १६ मध्ये घाणीचे साम्राज्य, नागरिकांचा मनपाला आंदोलनाचा इशारा

अमरावती शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांनी आता थेट महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. अलीमनगर, रेहेमतनगर आणि पश्चिमेकडील मुस्लिम बहुल भागात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. महापालिकेच्या मनमानी कारभारामुळे आणि दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, ऑल इंडिया कौमी तजिम महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मनपा प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये गेल्या चार ते सहा महिन्यांपासून स्वच्छतेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. अलीमनगर, रेहेमतनगर आणि परिसरातील अनेक भागांमध्ये नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत, रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या भागात नियमित साफसफाई करणारे कर्मचारीच दिसत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने घरगुती कचरा रस्त्यांवरच साचत आहे, तर सकाळची नियमित झाडलोटही होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सततच्या अस्वच्छतेमुळे परिसरात डास, माशा आणि दुर्गंधीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

या गंभीर परिस्थितीविरोधात ऑल इंडिया कौमी तजिम महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा सुटीवर असल्याने अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांना नागरिकांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक रफीक यांनी प्रशासनाला थेट इशारा देत सांगितले की, तात्काळ स्वच्छता मोहीम सुरू न केल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. गरज पडल्यास संपूर्ण प्रभागातील कचरा गोळा करून तो थेट मनपा कार्यालयात टाकण्यात येईल, असा संतप्त इशाराही त्यांनी दिला.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नियमित साफसफाई, नाल्यांची तातडीने सफाई आणि घंटागाडी सेवा सुरळीत सुरू करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अमरावतीतील स्वच्छतेचा प्रश्न आता केवळ तक्रारींपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर मुद्दा बनला आहे. प्रशासनाने वेळेत ठोस पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button