Amaravti GraminAmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

परतवाडा कांडात नवे धक्कादायक वळण; मुख्य आरोपी उजेर पुन्हा अटकेत, डिजिटल पुरावे जप्त

परतवाडा… हे नाव घेताच आजही अनेकांच्या अंगावर शहारे येत आहेत. संपूर्ण राज्यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या परतवाडा कांडात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतशी या प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर होत असल्याचे दिसत आहे.

परतवाडा येथे घडलेल्या या गाजलेल्या प्रकरणाने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. २७ एप्रिल २०२६ रोजी अचलपूर न्यायालयाने या प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवत सेंट्रल जेलमध्ये रवाना केले होते. मात्र, याच प्रकरणात आता आणखी एक मोठे वळण समोर आले आहे.

या प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी मानला जाणारा उजेर याला परतवाडा पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. एका पीडित युवतीने दिलेल्या नव्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई करत २८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपी उजेरला २ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिस कोठडीत घेतल्यानंतर उजेरची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, या चौकशीत पोलिसांनी त्याच्याकडून महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये लॅपटॉप, आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या डिजिटल उपकरणांमधून आणखी गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

सध्या परतवाडा पोलीस उजेरची कसून चौकशी करत असून, त्याच्या डिजिटल कनेक्शन, संपर्क साखळी आणि इतर संशयित व्यक्तींशी असलेले संबंध तपासले जात आहेत. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणामुळे परतवाड्याची प्रतिमा गंभीरपणे मलिन झाली असून, नागरिकांमध्ये संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण कायम आहे. या प्रकरणातील प्रत्येक नवीन खुलासा समाजाला हादरवणारा ठरत असून, आता या तपासातून आणखी किती धक्कादायक सत्य समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परतवाडा कांडातील तपास वेगाने सुरू असून, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता हे प्रकरण आणखी मोठे रूप धारण करण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर सर्वांची नजर खिळली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button