पोमनाळा तहानलेलं! हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी धडपड; प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा संताप

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असताना पोमनाळा गावात भीषण पाणीटंचाईने नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गावात तीव्र जलसंकट निर्माण झाले असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना दिवस-रात्र जीवघेणी कसरत करावी लागत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संतप्त ग्रामस्थांचा रोष आता टोकाला पोहोचला आहे.
भोकर तालुक्यातील पोमनाळा गावात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा प्रश्न कायम असून, यंदा परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. गावातील एकमेव आड म्हणजेच विहीर हेच पाण्याचे एकमेव साधन उरले आहे. मात्र या विहिरीतही अत्यल्प आणि गढूळ पाणी उपलब्ध असल्याने ग्रामस्थांना अस्वच्छ पाणी पिण्याची वेळ आली आहे.
गावातील महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना पाण्यासाठी दिवस-रात्र रांगा लावाव्या लागत आहेत. पाणी मिळवण्यासाठी अनेकदा तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. काही कुटुंबांना दोन ते तीन दिवसांनी आंघोळ करण्याची वेळ येत असून, “काम करावं की पाणी भरावं?” असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.
गेल्या २० ते ३० वर्षांपासून गावात हा प्रश्न कायम असताना प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. काही ग्रामस्थांनी आंदोलन, निवेदने आणि अमरण उपोषणाचाही मार्ग अवलंबला, मात्र प्रशासनाने केवळ आश्वासनांपलीकडे काहीच केले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींवरही ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या काळात मोठमोठी आश्वासने दिली जातात, मात्र निवडणूक संपताच गावाकडे कोणी फिरकत नाही, असा संतप्त आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
सध्या वाढत्या तापमानामुळे विहिरीतील पाण्याची पातळी आणखी खालावली असून, ग्रामस्थांना दूरवर भटकंती करून हंडाभर पाणी मिळवावे लागत आहे. उन्हाच्या झळा, अस्वच्छ पाणी आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
पोमनाळा गावातील पाणीटंचाई ही केवळ एका गावाची समस्या नसून ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण बनली आहे. ग्रामस्थांनी तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली असून, प्रशासन या प्रश्नाकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



