“महिला आरक्षण विधेयक फसल्याने भाजपच्या पडझडीची सुरुवात” ; ममता बॅनर्जींचा एनडीए सरकारवर जोरदार हल्ला

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात केंद्र सरकारला अपयश आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि एनडीए सरकारवर जोरदार टीका केली आहे. “भाजपच्या पडझडीची सुरुवात झाली आहे,” असा थेट हल्ला त्यांनी केला.
शनिवारी हावडा जिल्ह्यातील उलुबेरिया येथे आयोजित निवडणूक सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, महिला आरक्षणासाठीचे संविधान दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात भाजपला अपयश आले, यावरून स्पष्ट होते की केंद्रातील सरकार कमकुवत झाले आहे.
ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, भाजपला लोकसभेत आवश्यक बहुमत मिळाले नाही आणि त्यामुळे पक्षाचा पराभव झाला आहे. “भाजप आता स्वतःच्या बळावर नाही. ते केवळ मित्रपक्षांच्या आधारावर सत्तेत टिकून आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
महिला आरक्षणासंदर्भातील विधेयकात २०२९ पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, या विधेयकाला आवश्यक दोन-तृतियांश बहुमत न मिळाल्याने ते लोकसभेत नामंजूर झाले.
याच मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या सीमांकनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. भाजप देशाचे विभाजन करू पाहत असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटलं, “सीमांकनाच्या नावाखाली भाजप देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हे होऊ देणार नाही.”
तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी भाजपवर महिलांना न्याय न देण्याचाही आरोप केला. “महिलांना आरक्षण देण्याच्या नावाखाली भाजपने केवळ राजकारण केलं. प्रत्यक्षात त्यांच्याकडे विधेयक मंजूर करण्याइतकं बहुमत नव्हतं,” असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, महिला आरक्षण विधेयक फेटाळल्यानंतर देशभरात राजकीय वातावरण तापलं असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.



