परतवाडा प्रकरणात उद्या मोठा खुलासा? पालकमंत्री बावनकुले थेट एसपी कार्यालयात; तपासाचा घेतला आढावा

परतवाडा प्रकरणामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात खळबळ उडालेली असताना, आज राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी थेट अमरावतीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देत प्रकरणाची सखोल समीक्षा केली. पोलीस तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असून, उद्या पोलीस अधीक्षक विशाल आनंद पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण अहवाल सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आजच्या भेटीदरम्यान पालकमंत्री बावनकुले यांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासोबत बंद दाराआड सविस्तर चर्चा केली. परतवाडा प्रकरणाची पार्श्वभूमी, आतापर्यंतची चौकशी, पुरावे आणि पुढील कारवाई याबाबत सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणावरून काही राजकीय नेत्यांकडून सातत्याने भडकाऊ वक्तव्ये केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी सर्वांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. “कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, चुकीची माहिती देऊ नका आणि जिल्ह्यातील वातावरण बिघडेल असे वक्तव्य टाळा,” असे स्पष्ट शब्दांत बावनकुले यांनी सांगितले.
भाजपच्या काही नेत्यांकडून प्रचारित करण्यात आलेल्या ‘१८०’ आणि ‘३५०’ या आकड्यांबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता, बावनकुले यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. या आकड्यांचा नेमका अर्थ काय, आणि ते कोणत्या आधारे सांगितले गेले, याबाबत त्यांनी मौन बाळगले.
तसेच, या भ्रामक आकड्यांमुळे अमरावती जिल्ह्याची बदनामी झाली का, असा प्रश्न विचारण्यात आला असता, त्यावरही त्यांनी थेट उत्तर दिले नाही. चुकीची माहिती पसरवणाऱ्या किंवा वातावरण तापवणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार का, याबाबतही पालकमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली नाही.
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना बावनकुले म्हणाले, “उद्या संपूर्ण सत्य जनतेसमोर येईल. पोलिसांनी सखोल तपास केला आहे. कोणतीही घाईघाईत निष्कर्ष काढू नयेत.”
मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतरही प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत. परतवाडा प्रकरणात नेमकं काय घडलं? ‘१८०’ आणि ‘३५०’ या आकड्यांमागचं सत्य काय? आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरं उद्याच्या पत्रकार परिषदेत मिळणार का, याकडे आता संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



