पाणी समजून विष प्राशन; दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीडगाव परिसरात अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. पेंटिंगसाठी घरात आणलेल्या तारपीनचा पाणी समजून घोट घेतल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत बालकाचे नाव अद्वविक शाम भदाडे असे आहे. घरात काही दिवसांपूर्वी पेंटिंगचे काम सुरू होते. त्या कामासाठी आणलेली तारपीनची बाटली स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आली होती. १२ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास खेळता खेळता अद्वविक त्या खोलीत गेला. तिथे ठेवलेली बाटली पाण्याची समजून त्याने त्यातील तारपीन पिले.
त्यानंतर त्याची प्रकृती अचानक खालावली. घाबरलेल्या पालकांनी तातडीने त्याला पारडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने त्याला मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. उपचार सुरू असतानाच या चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला.
या घटनेनंतर भदाडे कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले असून परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनीही या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
सावधानतेचे आवाहन:
घरात वापरले जाणारे तारपीन, आम्ल, कीटकनाशके यांसारखे धोकादायक द्रवपदार्थ नेहमी मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवावेत. अशा वस्तूंची सुरक्षित साठवण हीच अशा दुर्घटना टाळण्याची सर्वात महत्त्वाची खबरदारी आहे.



