Crime NewsLatest NewsNanded

नांदेड हादरले! मध्यरात्री टोळीयुद्धात तिहेरी हत्या; रुग्णालयात घुसूनही खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री भीषण टोळीयुद्ध उसळले असून या रक्तरंजित संघर्षात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. साईलाला आणि सदा या दोन कुख्यात टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून ही थरारक घटना घडली. विशेष म्हणजे, एका आरोपीची थेट शासकीय रुग्णालयात घुसून हत्या करण्यात आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृतांमध्ये अरिजितसिंग गजानन चव्हाण (२५, बालाजीनगर), सय्यद आवेज सय्यद खलील (२७) आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (२३, देगलूर नाका) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही टोळ्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून वर्चस्वाची लढाई सुरू होती. शुक्रवारी रात्री अरिजितसिंग चव्हाण हा कॅनाल रोड परिसरातील ई-स्क्वेअर येथे ‘धुरंदर’ चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट संपल्यानंतर रात्री दीड वाजताच्या सुमारास तो बाहेर पडताच, आधीपासून दबा धरून बसलेल्या साईलाला टोळीच्या सदस्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात अरिजितसिंगचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिस्थिती अधिकच चिघळली. अरिजितसिंगचा भाऊ राजेश चव्हाण याला घटनेची माहिती मिळताच तो रुग्णालयात पोहोचला. तेथे उपचार घेत असलेला आवेज जिवंत असल्याचे लक्षात येताच, संतप्त राजेशने रुग्णालयातच चाकूने सपासप वार करत आवेजची हत्या केली.

रस्त्यावर आणि रुग्णालयात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. रुग्णालय परिसरात मोठी धावपळ झाली असून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही आरोपींना ताब्यात घेतले असून, रुग्णालयात आणि संवेदनशील भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या घटनेमुळे नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button