कल्याणमध्ये विषारी नागाची दहशत; तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. एका गॅरेजमध्ये लपून बसलेल्या विषारी नागामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून, या नागाच्या दंशामुळे तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गांधारी परिसरातील एका गॅरेजमध्ये हा विषारी नाग गेल्या अनेक दिवसांपासून लपून बसला होता. परिसरात वावरणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर या नागाने अचानक हल्ला केला. नागाच्या विषारी दंशामुळे तिन्ही कुत्र्यांची प्रकृती गंभीर झाली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
एकामागून एक तीन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. यानंतर नागरिकांना परिसरात विषारी साप असल्याची खात्री पटली. घाबरलेल्या नागरिकांनी तातडीने सर्पमित्र दत्ता बोंबे यांना पाचारण केले.
सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी पोहोचून अत्यंत कौशल्याने त्या विषारी नागाला पकडले. हा नाग अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.
नागाला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. वनविभागाच्या मदतीने या नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात येणार आहे. या घटनेनंतर गांधारी परिसरात अजूनही भीतीचे वातावरण आहे. पावसाळा आणि वाढलेल्या गवतामुळे सापांचा मानवी वस्तीत वावर वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
साप दिसल्यास त्याला इजा न करता तात्काळ सर्पमित्र किंवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



