BhandaracitynewsLatest NewsMaharashtra

चिचोलीत मध्यरात्री भीषण आग; शेतकऱ्याचे घर जळून खाक, लाखोंचे नुकसान

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील चिचोली गावात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याचे घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या घटनेत शेतीसाठी लागणारे महत्त्वाचे साहित्यही नष्ट झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ही घटना २५ मार्च २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. देविदास जांभुळकर या शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आग लागल्याचे लक्षात येताच गावातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले.

या आगीत शेतीसाठी वापरले जाणारे सुमारे ५० पाईप, औषध फवारणीचे यंत्र, दुचाकी, सायकल तसेच इतर जीवनावश्यक वस्तू पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच चिचोलीचे सरपंच प्रमोद प्रधान यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचा आढावा घेतला. त्यांनी पीडित शेतकऱ्याला शासकीय मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून पंचनामा करून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button