कारंजात पाणीपुरवठा बंद; थकीत वसुलीच्या कारवाईचा फटका प्रामाणिक ग्राहकांना, महिलांचा संताप

कारंजा शहरात जीवन प्राधिकरण चा अजब कारभार समोर आला असून, थकीत पाणी बिल वसुलीच्या कारवाईचा फटका नियमित बिल भरणाऱ्या नागरिकांनाही बसत आहे. संपूर्ण पाईपलाईन बंद करण्यात आल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील पंचशील नगर, मंगरुळ वेस, दाईपुरा आणि ओंकारेश्वर मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. यामुळे नागरिक, विशेषतः महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
जीवन प्राधिकरणाने थकीत बिल वसुलीसाठी कडक कारवाई करत संबंधित भागातील काही ग्राहकांनी बिल न भरल्यामुळे संपूर्ण लाईनच बंद केल्याचे सांगितले. मात्र, वेळेवर बिल भरणाऱ्या नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. “आम्ही नियमित बिल भरतो, मग आम्हाला पाण्यापासून वंचित का ठेवले?” असा सवाल महिलांनी उपस्थित केला.
या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी थेट जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. दरम्यान, स्थानिक नगरसेवक नदीम अहमद यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.
यावर संबंधित विभागाने सकारात्मक भूमिका घेत लवकरच समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून पाण्यासाठी त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कारवाई करताना निष्पाप नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आता प्रत्यक्षात पाणीपुरवठा कितपत सुरळीत होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



