पुण्यात थरकाप! २ वर्षांत २ मुलांचा एकाच पद्धतीने मृत्यू; सिरियल किलरचा धक्कादायक खुलासा

शिरूर तालुक्यातील दहिवडी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या गूढ मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, या प्रकरणात सिरियल किलर असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. २२ वर्षीय अक्षय दत्तात्रेय मांजरे याने दोन अल्पवयीन मुलांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याची कबुली दिली आहे.पहिली घटना २१ जून २०२४ रोजी, तर दुसरी घटना १७ मार्च २०२६ रोजी घडली. दोन्ही मुलांचे वय ११ ते १२ वर्षांच्या दरम्यान होते. विशेष म्हणजे, दोन्ही प्रकरणांमध्ये मुलांवर दगडाने हल्ला करण्यात आल्याचे समोर आले. याशिवाय, दोन्ही मृतदेह एकाच शेतात आढळून आले होते.सुरुवातीला पोलिसांनी या घटनांकडे गांभीर्याने न पाहता बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता व्यक्त केली आणि तपास वनविभागाकडे सोपवला. मात्र, वनविभागाने वन्यप्राण्यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही तपासात विलंब झाल्याचे दिसून आले.पहिल्या घटनेवेळीच आरोपी अक्षय मांजरे याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी केवळ प्राथमिक चौकशी करून त्याला सोडून दिले. याच निष्काळजीपणामुळे तो तब्बल २१ महिने मोकाट फिरत राहिला आणि दुसऱ्या घटनेतही एक मुलगा बळी पडला.आरोपीने समलैंगिक संबंधांना विरोध केल्याच्या कारणावरून हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे. या खुलाशामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या दुहेरी प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.



