मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा भीषण अपघात; ३ जणांचा जागीच मृत्यू

गुढी पाडव्याच्या दिवशीच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून, या दुर्घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. खालापूर ते पनवेल दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास एक पोलो कार अतिवेगात ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कार पलटून भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून, कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर काही काळासाठी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, बुधवारी देखील याच एक्सप्रेसवेवर चार ते पाच वाहनांच्या साखळी अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५ जण गंभीर जखमी झाले होते. सलग दोन दिवसांत घडलेल्या या भीषण अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अपघातातील मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
अतिवेग आणि बेदरकार ओव्हरटेकिंगमुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याने, वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



