अमरावतीत गॅस टंचाईवरून महिला काँग्रेसचे आंदोलन; चूल पेटवून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

अमरावती शहरात सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना गॅस एजन्सीसमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलीस बंदोबस्तही तैनात करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
याच पार्श्वभूमीवर इंडियन नॅशनल काँग्रेसच्या शहर महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्या महिलांनी प्रतीकात्मक निषेध म्हणून चूल पेटवून त्यावर स्वयंपाक करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री वानखडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, नोटबंदीच्या काळात जशा रांगा लागल्या होत्या तशाच आता केवायसी आणि गॅस सिलेंडरसाठी लागत आहेत. या परिस्थितीसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला जबाबदार धरत तीव्र टीका केली.
या आंदोलनात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, मनपा पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे तसेच स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.



