अमरावतीतील प्रभाग क्रमांक ६ मध्ये स्वच्छतेचे काम ठप्प; रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग, नागरिकांचा संताप

अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ अंतर्गत येणाऱ्या मोरबाग, विलासनगर, गवलीपुरा तसेच मशानगंज परिसरात गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छतेचे काम ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मधुबन चौक, चेतनदास बगीचा, झाडपीपुरा, स्वीपर कॉलनी आणि बजरंग टेकडी या भागांमध्ये रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्यांमध्येही मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नवीन स्वच्छता कंत्राटदाराचे कामगार या भागात नियमितपणे काम करताना दिसत नाहीत. सध्या फक्त पाच ते सहा कामगार परिसरात काम करताना दिसत असून तेही अपुरे असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, स्वच्छता कामगारांचे म्हणणे आहे की ते नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम करत आहेत; मात्र कचरा उचलण्यासाठी गाडी उपलब्ध नसल्यामुळे तो गाळ भरता येत नाही. त्यामुळे नाल्यांमधील कचरा रस्त्यावरच पडून राहत आहे. परिणामी अनेक ठिकाणी नाल्या पूर्णपणे तुंबल्या असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
या परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या भागाची पाहणी करून संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच नवीन स्वच्छता कामगारांची नियुक्ती करून संपूर्ण परिसराची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.



