सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकत भारताचा इतिहास; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भारतीय संघाला अभिनंदन

आयसीसीच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावत भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाचे मनापासून अभिनंदन केले आहे. भारतीय संघाची ही कामगिरी क्रिकेटप्रेमींसाठी अभिमानाची आणि अविस्मरणीय भेट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटले की, आयसीसीच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सलग दोनदा विजेतेपद मिळवणे ही अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी आहे. ही खेळी आणि हा विजय क्रिकेट विश्व कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे या जिगरबाज भारतीय क्रिकेटपटूंचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच दमदार खेळ केला. फलंदाज संजू सॅमसन यांच्या नेतृत्वाखालील फलंदाजीने वेगवान धावा केल्या, तर गोलंदाज अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला रोखून धरले. क्षेत्ररक्षणात ईशांत किशन आणि तिलक वर्मा यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली.
क्रिकेट हा सांघिक खेळ असून त्यासाठी लागणारी मेहनत, समन्वय आणि खिलाडूवृत्ती यांचे उत्तम दर्शन भारतीय संघाने घडवले असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. या ऐतिहासिक विजयामागे खेळाडूंसह प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि संघ व्यवस्थापनातील सर्वांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीयांच्या क्रिकेटप्रेमाची जगभरात ओळख करून देणारी ही कामगिरी असून भारतीय संघाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा अभिनंदन केले आहे.



