AmravatiCrime NewsLatest News

अमरावतीत छत्री तलाव हत्याकांडाचा 24 तासांत उलगडा

अमरावती शहरात अत्यंत धक्कादायक आणि थरारक खून प्रकरणाचा अवघ्या 24 तासांत उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. छत्री तलाव परिसरातील जंगलातील विहिरीत सापडलेल्या अज्ञात मृतदेहामागील गूढ अखेर उलगडले असून या प्रकरणात तब्बल आठ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यातील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

01 मार्च 2026 रोजी छत्री तलाव परिसरातील जंगलातील एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. माहिती मिळताच अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत वरिष्ठ अधिकारी आणि शहर गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत्यू संशयास्पद असल्याने तात्काळ तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक चौकशीत मृतदेहाची ओळख पटवणे हे मोठे आव्हान होते. पोलीस स्टेशन फ्रेजरपूरा येथे दाखल मिसिंग तक्रार आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने अवघ्या चार तासांत मृतकाची ओळख अमर मोतीलाल व्यास, वय 34, रा. महादेवखोरी, अमरावती अशी पटविण्यात आली. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यू तीन दिवसांपूर्वी झाला असून मांडीवर आणि इतर भागांवर चाकूचे वार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार अकस्मात मृत्यूचे प्रकरण खूनामध्ये रूपांतरित करण्यात आले.

तपासादरम्यान कोणतेही सीसीटीव्ही फुटेज किंवा तांत्रिक पुरावे उपलब्ध नव्हते. मात्र पारंपरिक तपास पद्धती आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली. तपासात निष्पन्न झाले की, आरोपी आदेश रघूनाथ तेलमोर वय २४ रा, महादेव खोरी याचे काही उधारीचे पैसे मृतकाकडे बाकी होते. त्या वादातून आरोपींनी मृतकाला छत्री तलाव परिसरात नेले आणि लाथाबुक्यांनी, लाठ्यांनी तसेच चाकूने वार करून निर्घृणपणे खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलातील विहिरीत फेकण्यात आला.या प्रकरणात
१) आदेश रघूनाथ तेलमोर वय २४
२) रोहीत संजय तायडे वय २३ वर्ष
३) दिप उर्फ यशोदीप विनायकराव वेलकर वय २५ वर्ष
४) जय नागोराव कोकाटे वय १९ वर्ष
५) गौरव दिलीप गजभीये वय २५
६) निश्चय सुनील पोटफोडे वय २१ वर्ष
७) संजय विलास वानखडे वय २३ वर्ष
८) तुषार अनिल सुपनेर वय २५ वर्ष
असे एकूण आठ आरोपी निष्पन्न झाले असून आरोपी आदेश रघूनाथ तेलमोर, रोहीत संजय तायडे आणि दिप उर्फ यशोदीप विनायकराव वेलकर हे आधीच नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील खून प्रकरणात मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत. आरोपी जय नागोराव कोकाटे, गौरव दिलीप गजभीये, संजय विलास वानखडे आणि निश्चय सुनील पोटफोडे यांना विविध भागातून ताब्यात घेण्यात आले असून आरोपी तुषार अनिल सुपनेर अद्याप फरार आहे. यातील काही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापतीचे गुन्हे यापूर्वी नोंद आहेत. अत्यंत क्लिष्ट, नियोजनबद्ध आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न असलेल्या या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 24 तासांत उलगडा करून शहर गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

अमरावती शहर गुन्हे शाखेच्या या धाडसी आणि कौतुकास्पद कारवाईमुळे आणखी एक गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button