AmravatiFestival NewsLatest News

इको-फ्रेन्डली होळी का साजरी करावी?

होळी आणि धुलिवंदनाचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रंगांची उधळण, आनंद आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा सण साजरा करताना आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो आहोत का? बाजारात मिळणारे बहुतांश रंग रासायनिक घटकांनी तयार केलेले असून ते त्वचा, डोळे आणि श्वसनसंस्थेसाठी घातक ठरू शकतात. याच संदर्भात अमरावतीतील तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे महत्त्वाचा इशारा…

होळी हा भारतातील आनंद, उत्साह आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणारा सण आहे. वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक असलेला हा रंगोत्सव प्रेम, आपुलकी आणि एकोप्याचा संदेश देतो. मात्र अलीकडच्या काळात बाजारात उपलब्ध होळीचे रंग मोठ्या प्रमाणावर रासायनिक घटकांनी तयार केलेले असतात. या रंगांमध्ये स्वस्त कृत्रिम रंगद्रव्ये आणि जड धातू — जसे की शिसे आणि क्रोमियम — मिसळलेले असण्याची शक्यता असते.

अशा रंगांचा त्वचेवर थेट परिणाम होतो. अलर्जी, त्वचेवर लालसरपणा, सूज, खाज सुटणे, डर्माटायटीससारखे विकार उद्भवू शकतात. काही वेळा त्वचा कोरडी पडणे आणि जळजळ होणेही दिसून येते. डोळ्यांवरही याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. डोळ्यांत जळजळ, पाणी येणे, सूज आणि गंभीर प्रकरणांमध्ये कॉर्नियाला इजा होण्याची शक्यता असते. रंगातील सूक्ष्म कण श्वासावाटे शरीरात गेल्यास खोकला, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास आणि दमा वाढण्याचा धोका संभवतो.

केस आणि टाळूवरही दुष्परिणाम दिसून येतात – केस कोरडे होणे, कोंडा वाढणे आणि केस गळती होणे. यासोबतच हे रंग पाण्यात मिसळून जलस्रोतांचे प्रदूषण करतात आणि मातीची गुणवत्ता घसरवतात. यावर उपाय म्हणजे नैसर्गिक रंग. फुले, हळद, बेसन, पालक, बीट यांसारख्या वनस्पतीजन्य घटकांपासून तयार केलेले रंग जैवविघटनशील, विषमुक्त आणि पर्यावरणपूरक असतात. नैसर्गिक रंग मुलांसाठी अधिक सुरक्षित मानले जातात कारण त्यांची त्वचा नाजूक असते.

अमरावती येथील त्वचारोग तज्ञ डॉ. श्रेया श्रीगोपाल राठी यांनी सांगितले की, रासायनिक रंगांमुळे त्वचारोग वाढण्याचे प्रमाण सणाच्या काळात वाढते. तर नेत्ररोग तज्ञ डॉ. राजेश श्रीधरराव जवादे यांनी डोळ्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना नैसर्गिक रंग वापरण्याचे आणि सुरक्षित होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. नैसर्गिक रंगनिर्मिती हा ग्रामीण महिलांसाठीही एक उत्तम व्यवसाय पर्याय ठरू शकतो. स्थानिक संसाधनांचा वापर करून शाश्वत उद्योग उभारता येऊ शकतो.

तर होळी साजरी करताना केवळ रंगांचा नाही तर आरोग्याचाही विचार करा. नैसर्गिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रंग वापरून आनंदी आणि निरोगी होळी साजरी करूया.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button