AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत ७ मार्चपासून “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान”; महसूल सेवा थेट नागरिकांच्या दारी

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी महसूल विभागाच्या वतीने ७ मार्चपासून “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ वलगाव येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमामुळे महसूल विभागाच्या सेवा आता थेट नागरिकांच्या दारी उपलब्ध होणार आहेत.


अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाच्या पहिल्या टप्प्याला ७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. वलगाव येथे होणाऱ्या उद्घाटनानंतर संपूर्ण जिल्ह्यातील ९५ महसूल मंडळांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे.

या उपक्रमांतर्गत जमिनीचे उतारे, फेरफार, नामांतरण, उत्पन्न व जात प्रमाणपत्र, नकाशे, प्रलंबित प्रकरणे तसेच इतर महसुली सेवा गावपातळीवरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली निघावीत आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील दरी कमी व्हावी, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता आणि गती येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


महसूल सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचविणारे हे अभियान अमरावती जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ७ मार्चपासून सुरू होणाऱ्या या उपक्रमाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button